नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्र प्रो. राबी म्हणाले होते, 'शाळेतून मी घरी आल्यावर माझी आई मला फक्त एकच प्रश्न करायची. आज वर्गात तू कोणता चांगला प्रश्न विचारलास? माझ्या यशाचे गमक, आईचा तो प्रश्न आहे.' जहाजातून प्रवास करताना डॉ. रमण यांना शांत समुदाचं पाणी निळं का, हा प्रश्न पडला व त्याचे त्यांनी उत्तर शोधले. विश्वाच्या भव्यतेची एकरूपता हा प्रश्न आइनस्टाईन यांना पडला आणि सापेक्षता सिद्धांत पुढे आला. दोन वेळा नोबेल पारितोषिक मिळालेले प्रो. लाइनस पॉलींग, कॉलेजच्या पहिल्या वर्षातील मुलांना-मुलींना पहिल्याच तासाला सांगायचे, 'तुम्ही मला केव्हाही प्रश्न विचारू शकता.' क्षणभर स्मितहास्य करून ते म्हणायचे, 'तुमचा प्रश्न कितीही मूर्खासारखा असला तरी. या अडाणी प्रश्नावर मी विचार करतो तेव्हा मला काहीतरी नावीन्यपूर्ण आढळते.' अमेरिकेत माझे मार्गदर्शक प्रथमच सांगायचे तुमचे कष्ट, प्रयास हे तर मला हवेतच; पण मला खऱ्या हव्यात तुमच्या कल्पना, तुमचे प्रश्न. आठवड्याच्या चचेर्त प्रत्येकाला ते प्रश्न निर्माण करायला सांगत. एखाद्याने मला काहीही प्रश्न नाहीत असे म्हटले की नाराजीने व थोड्या कडवटपणे म्हणत, 'नशीबवान आहेस, तुला तर प्रश्नच नाहीत.'
प्रश्नाबाबतची अनास्था आपल्याकडे कधीपासून आली असावी? मोठ्ठ्या माणसांना प्रश्न करायचे नाहीत. 'बाबा वाक्यम् प्रमाणम्' याच्या परिघात आपण राहिलो. तत्त्वज्ञान वा विज्ञान या क्षेत्रांत आपण मागे पडलो याचं हेही एक सामाजिक कारण आहे. शिक्षकाची वैगुण्ये शोधून त्याबाबत चर्चा करायची, त्याला टोपण नावाने बोलायचं आणि वर्गात गडबड केल्याने आनंद मिळवायचा ही प्रवृृत्ती वाढली. युरोप-अमेरिकेत खाजगी आयुष्यात कोणी दखल घेत नाही, विद्याथीर् वर्गात लांब पाय टाकून बसलेले असतात. शिकविणे शिक्षकाचे कर्तव्य. त्यासाठी त्याला पैसे मिळतात. शिक्षण घेणं माझं कर्तव्य; कारण मी फीसाठी पैसे मोजलेत हा रोखठोक व्यवहार. तेथे एक सेमिस्टर मी शिकविले. माझे उच्चार त्यांना विचित्रही वाटले असतील, शिकविण्याची पद्धत अनोखी वाटली असेल; पण संपूर्ण तीस विद्यार्थ्यांचा वर्ग शांत असायचा.
- डॉ. द. व्यं. जहागिरदार
.................
रसायनशास्त्राचे प्राध्यापक, ज्येष्ठ विज्ञानलेखक असणाऱ्या जहागिरदारांनी अमेरिकेत चार वर्षं संशोधन केलं. एकंदर १६ पुस्तकं प्रसिद्ध.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट