Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 32

दुरून डोंगर साजरे

$
0
0

डॉ. द. व्यं. जहागिरदार

निसर्ग नेहेमीच सुंदर भासतो. त्याचे सौंदर्य असते त्याच्या भव्यदिव्य रूपामुळे. हिमालयाच्या उंच रांगा, नायगारा धबधबा, ग्रँड कॅनियन, गंगेचा ऋषिकेशला धो धो वाहणारा नितळ प्रवाह, हैदराबादजवळ ठाण मांडून बसलेल्या चित्रविचित्र, प्रचंड शिळा या प्रथमदर्शनी थक्क करतात. नकळत तोंडातून शब्द बाहेर पडतात, 'किती सुंदर!' आकाशात जमलेले काळेकुट्ट ढग, विजांचा कडकडाटही सुंदर भासतो- भीती वाटली तरी! ढग तर अस्ताव्यस्त व विजा अरेषीय, वडाच्या लांब पसरलेल्या फांद्या, माडाचं उंच झाड, हत्तीचं भव्य रूप, बगळ्याची चोच हे सारे असममीत असतात. तरीही आपण कौतुकाने त्यांच्याकडे पाहतो. हे झालं निसर्गाचं सगुण रूप.

मानवाने सौंदर्यस्थळे निर्माण केलीत, मात्र ती सर्व सममीत आहेत. ताजमहाल, पिरॅमिडस्, मदुराईचे मीनाक्षी मंदिर, आयफेल टॉवर, कुतुब-मिनार या साऱ्या वास्तू सूूत्रबद्ध आहेत. त्यांची नियमबद्ध बांधणीच त्यांना सौंदर्य देते. पाहता क्षणी त्या सुंदर वाटतात; कारण त्यांच्या देखणेपणात साठविलेली सममिती. मानवी शरीरही सममीत आहे. डोळे, कान, नाक, दात यांची जागा अगदी शिस्तबद्ध वाटते. या सममितीत थोडा बदल झाला, हाताला सहावे बोट असले, दात पुढे असले तर चेहऱ्याच्या सौंदर्याला गालबोट लागल्यासारखे वाटते. सजीव मानवाला निसर्गाने सममीत केले, आदिमानवाने सूर्य, चंद, तारे यांचे गोलाकार रूप पाहिले. वर्तुळ म्हणजे महत्तम सममीत आकृती; आकाशातील हे चमकणारे गोळे पाहूनच टॉलेमीला वस्तूंची सममिती समजली.

सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यांत असते. शिवाय, ते समाज व संस्कृती यावरही अवलंबून असते. सुंदर भारतीय स्त्री, चिनी लोकांना सुंदर वाटेल का? ज्या समाजात आपण राहतो त्याच्या सौंदर्याच्या रुळलेल्या कल्पनांनाच आपण अजाणता आत्मसात करतो.

अतिप्रचंड स्थूल वस्तू सुंदर भासतात, तर अतिसूूक्ष्म निजीर्व वस्तू कशा असतात? अणू सर्वांत सूूक्ष्म; पण तो अगदी सममीत. केंदकात प्रोटॉन, बाहेर इलेक्ट्रॉन. अणूची आणखी एक गंमत- हा आंतरिक सूूत्रबद्ध असलेला अणू बाहेर कसा वागतो? वायूंचे अणू स्वैर फिरतात, त्यांच्या फिरण्यात सुसूूत्रता नसते. आंतरिक शिस्त, बाहेर बेशिस्त हे अणूंचं द्वैत थक्क करते. किंबहुना सृष्टीचा सम्यक् अभ्यास केला तर असे द्वैत बऱ्याच ठिकाणी आढळते. नाण्याला जशा दोन बाजू, तशाच या दोन बाजू.

निसर्गनिमिर्त महाकाय वस्तू, त्यांच्या भव्यतेमुळे आपणाला सुंदर वाटतात. पर्वताच्या जवळ गेल्यास त्याचा ओबडधोबडपणा जाणवतो. म्हणजेच याचे सौंदर्य दूरवरचे. 'दुरून डोंगर साजरे' ही म्हण अशा समृद्ध अनुभवातून आली असावी. निसर्गाची सममिती मोजण्याचे मापदंड आपल्यापेक्षा वेगळे आहेत का? निसर्ग भूमिती पाळतो; पण ती असते खडबडीत, अनियमित, विचित्र. मँडरबेल्ट यांनी या क्षेत्रात खूपच संशोधन केले आहे. त्यांच्या मते, निसर्गासारख्या जटील महाप्रणालीत नियमित, सूूत्रबद्ध, सममिती रूतून बसलेली असते. ही अदृश्य, लपलेली सममिती कुतूहल जागे करणारी आहे, जिज्ञासा वाढविणारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 32

Trending Articles