खेड्यापाड्यातून आलेली ही तरुण मुलं बहुश्रुत नसत, पण बुद्धिवान असत. त्यांच्यातला आत्मविश्वास मी जागविला. ३५ वर्षांच्या काळात खूप विद्वान मंडळींना ऐकण्यात, पाहण्यात वेळ पटकन निघून गेला. पदार्थ-विज्ञानात नोबेल मिळविणारे एस. चंदशेखर यांचं भाषण म्हणजे तोलूनमापून उच्चारलेला प्रत्येक शब्द व त्या अन्वये निर्माण झालेले सुसूत्र वाक्य. इंग्रजी साहित्याचे नोबेल विजेते डॉ. गोल्डींग यांचं इंग्रजी इतकं सोपं होतं की त्यातील एकही शब्द आमच्या ऐकिवात नाही असा नव्हता. न्या. गजेंदगडकर, डॉ. एम. एस. स्वामीनाथन मुल्कराज आनंद, प्रा. पी. जी. पाटील यांच्या ज्ञानाचा आवाका पाहून मी नेहमीच थक्क झालो.
आमच्या रसायनशास्त्र विभा-गात भारतातील जवळपास सर्वच ज्येष्ठ शास्त्रज्ञांची भाषणे ऐकली. युडीसीटी मुंबईचे प्रा. शर्मा, आयआयटी मुंबईचे प्रा. खोपकर यांच्या जिभेवर सरस्वतीचा वरद-हस्त. अफाट ज्ञान, अफाट माहिती व ती सांगण्याची उत्सुकता त्यांच्या भाषणात दिसून येई. डॉ. माशेलकर यांचं इंग्रजी, रसायन-शास्त्र, उत्साह यांच्या एकत्री-करणाने झालेले भाषण म्हणजे मेजवानी. पुणे विद्यापीठाचे प्रा. आणीर्कर अनेकदा आले. शेवटचे व्याख्यान आम्ही ठेवले तेव्हा ते ऐंशीच्या जवळपास होते. त्यांना खोकला येत होता. हात धरून मी त्यांना स्टेजवर नेलं. 'सर तुम्ही २०-२५ मिनिटेच बोला, ग्लासमध्ये कोमट पाणी ठेवले आहे.' मी म्हणालो. ते एक तास बोलले. खोकला नाही, पाय लटपटणे नाही, मुख्य म्हणजे फळ्यावर लिहिताना एकही समीकरण चुकले नाहीत. आपल्या विषयात ब्रह्माानंदी टाळी लागली की शरीरही कुरकूर करत नाही. हीच मंडळी आहेत आमच्या काळातील ऋषी-मुनी.
श्रोत्यांनी भरलेल्या हॉलमध्ये स्वत:चं शरीर आकसून स्मित चेहऱ्याने आलेत पुल, आणि त्यांनी हसवत ठेवला तो हॉल. पुढील ६० मिनिटे. बा. भ. बोरकरांच्या कविता आमच्या विभागाच्या लायब्ररी हॉलमध्ये ऐकल्या. कुरुंदकरांना मराठी विभागात. रांगणेकरांना अर्थशास्त्र विभागात. महाराष्ट्रातील सर्वच साहित्यिक, लेखक, कवि यांना जवळून पाहिले. मी चांगली पुस्तके लिहिलेल्या चांगल्या माणसांच्या सान्निध्यात वावरलो. हे शक्य झालं; कारण मी विद्यापीठात होतो.
स्वत: चांगलं असल्याशिवाय इतरांचा चांगुलपणा, मोठेपणा लक्षातच येत नाही. सहकाऱ्यांची, मित्रांची प्रगती पाहून मला कधी असूया वाटली नाही. हेवाही वाटला नाही. आमच्या कुटुंबात सर्व भाऊ-बहीण गुणागोविंदाने राहतो. सर्वजण साठीच्या पुढचे; पण आमच्यात दुराभाव नाही.
चांगल्या माणसांसोबत राहण्याइतकंच आपणही चांगलं असणं महत्त्वाचं. ते आई-वडिलांच्या जनुकातूनच आलं आहे. हेच माझं अध्यात्म आहे. आई-वडिलांच्या स्मरणानेच मी परमेश्वराचे निर्गुण रूप पाहतो आणि नातवंडे पाहून मला दिसतं, त्याचं सगुण रूप
- डॉ. द. व्यं. जहागिरदार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट