पंधराव्या शतकापासून सुरू झालेल्या वैज्ञानिक क्रांतीला ज्या शास्त्रज्ञांनी हातभार लावला त्यांचे जीवन कष्टाचे, मानहानीचे गेले. धर्मसत्ता-राज्यसत्ता या दोहोंचाही विरोध त्यांना सहन करावा लागला. गॅलिलिओला तर भरसभेत पृथ्वी स्थिर आहे, मी चुकलो असे त्रिवार म्हणण्याची, शिक्षा झाली. दारिद्याने गांजलेला, वार्धक्याने जर्जर झालेला, पाठीला वाक आलेला तो म्हातारा, ती शिक्षा, विचारांचा अपमान सहनकर्ता झाला. असे म्हणतात की तीन वेळा ते अमान्य वाक्य उच्चारून तो मागे फिरला आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटला 'ती अजून फिरतेच आहे.'
तेरा ते सोळाव्या शतकात महाराष्ट्रात युरोपसारखीच स्थिती होती. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ व रामदास या संतांनी अध्यात्माचे महत्त्व सांगितले. वारकरी संप्रदाय निर्माण झाला. ज्ञानेश्वरांनी 'आणि उदो अस्ताचेनि प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे' या ज्ञानेश्वरीतील ओवीत सूर्याचे स्थिर रूप कोपनिर्कसच्या आधी सांगितले आहे. गॅलिलिओने म्हटले आहे, 'ईश्वर तत्त्वरूपाने धर्मग्रंथात दिसतो आणि कृतिरूपाने निसर्गात दिसतो. परंतु प्रश्न उभा राहतो, ज्ञानेश्वरांना हे समजले असे? त्यांनी प्रयोग केले नव्हते. प्रयोगशील कार्यपद्धती त्यांनी वापरली नव्हती. परंतु निरीक्षण आणि प्रयोग यांच्या पलीकडे गेलेली एक विशेष अंतर्दृष्टी श्रेष्ठ संतांजवळ असते. त्यांना स्वत:पुरते हे जाणवते, वैज्ञानिक मात्र तो प्रयोग पुन: पुन्हा करू शकतो व आपल्या म्हणण्याची सत्यता दाखवू शकतो. विचारमंथनाची मात्र सर्वांनाच आवश्यकता असते.
ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाला समाजाने वाळीत टाकले होते, तुकारामांवर मंबाजीने प्रहार केला होता, तर एकनाथांवर एक म्लेंच्छ कित्येक वेळा थुंकला होता. नवविचार न पचणारे व या विचारवंतांचा द्वेष करणारे पाखंडी लोक, युरोपसारखे येथेही होते.
- डॉ. द. व्यं. जहागिरदार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट