प्रयोगशाळेत संशोधन करून, वैज्ञानिक निसर्गातील सत्य उलगडण्याचा प्रयत्न करतात. या शोधांचा सामान्य माणसाला ताबडतोब उपयोग नसे, किंबहुना त्या शोधाची माहिती देखील नसे. विज्ञानाचे शोध जेव्हा समाजासाठी वापरले जाऊ लागले, तेव्हाच तंत्रज्ञानाचा जन्म झाला. प्राचीन म्हणजेच सुरुवातीचे तंत्रज्ञान शेती अवजारे, खाणकाम, धातूकाम, औषधीशास्त्र हे पूर्वापार अनुभवातून निर्माण झालेली अवजारे, पदार्थ होते. त्यासाठी मूलभूत विज्ञानाची माहिती नसल्याने या तंत्रज्ञानाची प्रगती हळूहळू झाली. आज मात्र कुठलेही तंत्रज्ञान मूलभूत सत्याच्या भक्कम पायावर उभे असते.
तंत्रज्ञानाने प्राप्त झालेल्या लहान साधनांची, यंत्राची माहिती मजेशीर आहे. इ. स. १४५४ला जर्मनीत जोनॅथन गुटेनबर्गने छापखान्याचा शोध लावला. १६६८ साली न्यूटनने टेलिस्कोपचा, १६७१ला लेबनिझने बेरीज- वजाबाकी करणाऱ्या यंत्राचा, १७६९ जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा, त्याच सुमारास पियानो पोर्टलँड सिमेंटचा, ऑटोमोबाइलचा. फॅरेडेने १८३१ साली शोधलेला डायनामो आणि १८३७ साली मोर्सने निर्माण केलेले संदेशवाहक यंत्र. चारशे वर्षांच्या काळात या यंत्रांमुळे समाज बदलला. इंजिनाने वाहतूक व्यवस्था, सिमेंटने मजबूत व पक्की घरे, ऑटोमोबाइलने प्रवास, या गोष्टींनी जीवनाला गती आली आणि खऱ्या अर्थाने विज्ञान युरोपात घराघरात शिरलं. १८७९ साली थॉमस एडिसनने विद्युत् दिव्याचा शोध लावला. आपल्या संशोधनाचा व्यावहारिक उपयोग समाजाच्या फायद्यासाठी व्हावा हाच एकमेव उद्देश त्याच्यासमोर होता. हे दिवे महाग असल्याने, त्याचा वापर गरीबांना कठीण असे म्हणून ते मेणबत्या वापरीत. दिव्यातील धातूचे तंत्र स्वस्त करून दिवे गरीबांना स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा त्याने प्रयत्न केला.
तंत्रज्ञान हे विज्ञानाचे अपत्य नाही. मानवाची ती भिन्न प्रकारची क्रिया आहे. नुसत्या विज्ञानापेक्षा तंत्रज्ञानाने मानवी जीवनावर जास्त परिणाम केला आहे. विज्ञान हे कार्य जाणण्या-साठी असते. निसर्गातील रहस्यमय, अज्ञात घटना जाणून घेण्यासाठी ते राबविले जाते. तंत्रज्ञान राष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी उपयोगात आणले जाते. सराव करा, शोधून काढा हे तंत्रज्ञानाचे सूत्र आहे. दोघांमध्ये स्पर्धा असण्याचे कारण नाही. किंबहुना मागील २०-२५ वर्षांतील तंत्रज्ञानाचा झपाटा व आवाका पाहिला की आपण थक्क होतो. ही सर्व प्रगती मूलभूत वैज्ञानिक संशोधनाशिवाय होणे शक्यच नव्हते. मागील २५ वर्षांत जीवनाची गती वाढली आणि विज्ञानाच्या भिन्न शाखा व तंत्रज्ञान एकमेकांजवळ आल्या. अवकाश संशोधन, जेनोम प्रकल्प यासाठी याची गरज होती. प्राणीशास्त्राला गणिताची, भौतिकीला अर्थशास्त्राची व या सर्वांना कला व साहित्याची आवश्यकता होती. विश्वाचे, सत्याचे निर्गुण रूप जाणण्याचा हा विज्ञानाचा उपक्रम.
..........................
रसायनशास्त्राचे प्राध्यापक, ज्येष्ठ विज्ञानलेखक असणाऱ्या जहागिरदारांनी अमेरिकेत चार वर्षं संशोधन केलं. एकंदर १६ पुस्तकं प्रसिद्ध.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट