बाह्यसृष्टी म्हणजे आजूबाजूचा निसर्ग. निसर्ग ही एक गुंतागुंतीची अशी महाप्रणाली आहे. निसर्गावर प्रेम करा ही मानवी संस्कृती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी ही आमची विचारधारा. निसर्ग उदार हाताने सौंदर्याची उधळण करतो ती कविमनाला उत्तेजित करते व सर्वसामान्य माणसाला आनंद देते. शास्त्रज्ञ मात्र खोलात जाऊन निसर्ग समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातील सर्व क्रियांची भव्यता, सूत्रबद्धता पाहून थक्क होतात. कुठलाही पूर्वग्रह न ठेवता, भावनाविरहीत केलेली निरीक्षणे हा वैज्ञानिक प्रयोगाचा पाया. तेच तेच प्रयोग पुन: पुन्हा करून केलेली पडताळणी आणि त्यातून गवसलेलं निसर्गाचं छोटेखानी रूप, शास्त्रज्ञाला जे सुख देते ते अवर्णनीय असते. हमरस्त्यावर उघडानागडा पळत असलेला आकिर्मिडीज तेव्हा चक्क डोळ्यापुढे उभा राहतो. ज्येष्ठ संशोधक तेव्हा तरुण होतात आणि त्यांच्या तरुण विद्यार्थ्यांना आपण श्रेष्ठ प्रतीचं काम केलं, म्हणून दोघेही आनंदाच्या डोही, आनंदे तरंग या अवस्थेत जातात. सतत तीन दिवस अणू विज्ञानातील क्लिष्ट समीकरणे सोडवून सर्व विश्वाला अभिमान वाटावं असं 'श्रॉडींजर तरंग समीकरण' मांडणारे डॉ. श्रॉडींजर कार्यपूतीर्-नंतर मध्यरात्री घराजवळील बागेत लांब फेरफटका मारत. कार्यतृप्तीचा आनंद निसर्गाच्या सान्निध्यात घालवावा असं त्यांना वाटे. हा आहे निसर्गाचा मोठेपणा, निसर्गाचं दिव्यत्व.
निसर्गाचं चक्र सतत चालू असतं. आजचा दिवस कालच्या-सारखा नसतो. या बदलात मात्र सुसूत्रता असते. निसर्ग एकसुरी नाही, त्यात वैविध्य आहे. म्हणूनच तो लोभसवाणा आहे. निसर्ग चिरंजीव आहे. तो दयाळूही नाही व दुष्टही नाही. या दोन्ही मानवी भावना आहेत. तो निर्गुण आहे, भावनाविरहीत आहे. प्रेमळ वडिलांनी विनाकारण मुलाला छडी मारून शिक्षा करावी तसं हा निसर्ग कधी कधी वागतो. म्हणूनच निसर्गाला आपण समजून घ्यायचं आहे. त्याच्या कृपाछत्राखाली जीवन घालवायचे आहे.
बदल हाच निसर्गाचा स्थायीभाव आहे. अमेरिकेतील एका प्रसिद्ध विद्यापीठाचं हेच बोधवाक्य आहे. nothing is permannet here, except the change.' ह्या वाक्यातच ज्ञानाच्या प्रगतीचं, उच्च संशोधनाच्या गतीचं व सतत उंचावणाऱ्या नवविचारांचं मर्म आहे.
- डॉ. द. व्यं. जहागिरदार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट